Mahabhumi Bhulekh

तीन आकडी सातबारा म्हणजे काय


एखाद्या सातबारा उताऱ्यामध्ये सामाईक क्षेत्रातील वैयक्तिक हिश्श्याची माहिती दर्शवण्यासाठी महाराष्ट्रातील महसूल विभागात 3 आकडी सातबारा ही संकल्पना वापरली जाते.
जेव्हा एखाद्या सातबारा उताऱ्यावर अनेक खातेदार (हिस्सेदार) असतात तेव्हा त्यातील प्रत्येकाचा हिस्सा किती हे स्पष्ट करण्यासाठी एक अतिरिक्त तक्ता जोडला जातो त्याला ३ आकडी सातबारा असे म्हटले जाते.


३ आकडी सातबारा चा उपयोग

  • वैयक्तिक हिस्सा स्पष्ट करण्यासाठी: सातबारावर जमिनीचे एकूण क्षेत्रफळ आणि सर्व मालकांची (हिस्सेदार) नावे असतात. परंतु ३ आकडी सातबारा मुळे त्या सातबारा मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या नावावर किती क्षेत्र आहे हे समजते.
  • स्वतंत्र मालकी स्पष्ट होण्यास मदत: तुमची जमीन नक्की कुठे आणि जमिनीचे क्षेत्रफळ किती आहे हे नकाशासह स्पष्ट होते.
  • जमिनीचा दस्त तपासणी: जमिनीच्या एकूण क्षेत्राची विभागणी आणि त्यानुसार येणारा शेतसारा याची नोंद असते.
  • बँकेतून कर्ज घेण्यासाठी आवश्यक: जेव्हा एखाद्या हिस्सेदाराला त्याच्या हिश्श्याच्या जमिनीवर कर्ज काढायचे असते तेव्हा बँक ३ आकडी सातबारा उताऱ्याची मागणी करते जेणेकरून त्या हिश्यावर त्या व्यक्तीची स्वतंत्र मालकी सिद्ध होईल.
  • जमीन विक्री: सातबारा उताऱ्यातील एखादा हिस्सेदाराला स्वतःच्या नावावरील जमीन (स्वतःचा हिस्सा) विकायची असेल तर अशा वेळी 3 आकडी सातबारा उताऱ्याचा उपयोग होतो. जमीन विकताना इतर सह-हिस्सेदारांच्या संमतीची गरज भासत नाही.
  • सरकारी योजना: पीक विमा किंवा नुकसान भरपाईची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास मदत होते.
  • जमीन खरेदी करताना: जर एखाद्या व्यक्तीला एखाद्या शेतकऱ्याच्या हीश्याची जमीन विकत घ्यायची असेल तर या 3 आकडी सातबारा ची आवश्यकता असते.

संयुक्त सातबारा आणि ३ आकडी सातबारा यातील फरक

वैशिष्ट्ये संयुक्त सातबारा ३ आकडी सातबारा
ओळख संयुक्त सातबारा ला फक्त एकच गट नंबर असतो (80) 3 आकडी सातबारा ला गट/हिस्सा/पोटहिस्सा (80/1/2)
हक्क संपूर्ण क्षेत्रात तुमचा वैयक्तिक हिस्सा कोणता हे सिद्ध होत नाही. 3 आकडी सातबारा नकाशात तुमचा वैयक्तिक हिस्सा निश्चित असतो.
व्यवहार जमिनीची विक्री करताना इतर हिस्सेदारांची संमती लागते. 3 आकडी सातबारा मध्ये तुमच्या हीश्याची जमीन निश्चित असते त्यामुळे तुम्ही स्वतंत्रपणे तुमच्या हीश्याच्या जमिनीचा व्यवहार करू शकता.
कर्ज सर्व सह हिशेदारांच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. तुमच्या स्वतःच्या हिशावर तुम्हाला स्वतंत्र कर्ज घेता येते. त्यासाठी सह हिशेदारांच्या संमतीची गरज लागत नाही.

३ आकडी सातबारा करण्याची प्रक्रिया:

जर तुम्हाला तुमचा सातबारा ३ आकडी करायचा असेल तर खालीलप्रमाणे प्रक्रिया पार पाडावी लागते.

  • मोजणी साठी अर्ज: सर्वात प्रथम तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन भूमी अभिलेख विभागाकडे जमिनीच्या मोजणीसाठी अर्ज करावा लागतो. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती तसेच आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज जमा करावा लागतो. (हा अर्ज आता ऑनलाइन पद्धतीने 'ई-मोजणी' पोर्टलवर करता येतो.)
  • मोजणी फी: अर्ज करताना तुमच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार सरकारी फी भरावी लागते.
  • मोजणीची तारीख: तुमच्या जमिनीची मोजणी कधी केली जाईल याची तारीख तुम्हाला पोस्टाने कळवली जाते. यावेळी शेजारच्या सर्व खातेदारांना देखील नोटीस दिली जाते.
  • प्रत्यक्ष मोजणी: तुम्हाला दिलेल्या तारखेला मोजणी साठी सरकारी माणसे येतात आणि तुमच्या जमिनीची मोजणी केली जाते.
  • नकाशा तयार करणे: तुमच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाल्यावर तुमच्या जमिनीचा स्वतंत्र नकाशा तयार केला जातो.
  • कमी-जास्त पत्र: मोजणी अधिकारी एक तांत्रिक अहवाल तयार करतात ज्याला कमी-जास्त पत्र म्हणतात. यात जुन्या गटातून नवीन हिस्सा कसा वेगळा झाला याची नोंद असते.
  • तलाठी नोंद: हे पत्र तहसीलदार कार्यालयामार्फत गावातील तलाठ्याकडे जाते. त्यानंतर तलाठी सातबारावर 80/१, 80/२ अशी स्वतंत्र नोंद करतात.

महत्त्वाच्या गोष्टी:

सरकारी मोजणी: ३ आकडी सातबारा मिळवण्यासाठी 'गुंठेवारी' किंवा 'पोटहिस्सा' मोजणी' करणे अनिवार्य असते.


सरकारी पत्र: गुंठेवारी' किंवा 'पोटहिस्सा' मोजणी झाल्यानंतर भूमी अभिलेख कार्यालय एक पत्र तयार करते त्यानंतर तलाठी सातबारावर ३ आकडी नोंद करतात.


जेव्हा तुमचा सातबारा ३ आकडी होतो तेव्हा तुमच्या नावे असलेला ८-अ उतारा सुटा होतो. व त्या गावात तुमच्या मालकीची एकूण किती जमीन आहे याची संपूर्ण माहिती मिळते.


जुन्या काळात कुटुंबात जमिनीची तोंडी वाटणी झालेली असते पण कागदोपत्री अशी वाटणी झालेली नसते अशा वेळी सर्व वारसदारांनी आपापसातील संमतीने 'वापसनामा' किंवा 'हक्कसोड पत्र' नोंदणीकृत करून घेतल्यास ३ आकडी सातबारा होणे सोपे जाते. यामुळे भविष्यात भावा-भावांमध्ये होणारे जमिनीचे वाद कायमचे मिटतात.


© 2026 All Rights Reserved